शिशुकुलचे बीज दि. १ सप्टेंबर १९६२ रोजी शांतावाडीच्या भूमीत पेरले गेले. तिथे शिशुकुलचा श्रीगणेशा गिरवला गेला. १९६६ साली शिशुकुल विभाग सध्याच्या या इमारतीत स्थलांतरित झाला. घराप्रमाणेच आपुलकी प्रेम मिळत असल्यामुळे शिशुकलमधली चिमुकली मुले इथे स्वच्छंदपणे बागडतात. संस्कृती आणि संस्कारांचे शिंपण शिशुमनावर करणे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच विद्या विकास मंडळ संस्थेचे ध्येय आहे .मुलांची निरीक्षण क्षमता ,बौद्धिक विकास त्यांच्या मधील आत्मविश्वास वाढविणे त्याच बरोबरीने स्वावलंबनाचे धडे देणे यांच्याशी निगडीत अनेक उपक्रमांनी या चिमुकल्यांचे आयुष्य समृद्ध व्हावे असा संस्थेचा मानस आहे अगदी संस्कृती सणांच्या महतीपासून व्यक्तिमत्व विकासा पर्यंत जे जे पुरक उपक्रम आहेत जे शालेय आयुष्याची पायाभरणी सर्व बाजूंनी पक्की करण्यास मदत करतात ते सगळे उपक्रम आम्ही राबवतो. मुलांचे वाढदिवस त्यांचे औक्षण करून साजरे केले जातात. वर्तमानपत्रात या मुलांचे फोटो देऊन त्यांचे अभिष्ट चिंतन केले जाते. दिंडी,दहिहंडी,रक्षाबंधन,आजी आजोबा दिवस, शारदोत्सव, पाटीपूजन असे विविध सण व उत्सव साजरे केले जातात. राष्ट्रीय भावना विकसित होण्यासाठी राष्ट्रीय सण देखील साजरे करण्यात येतात. नृत्य,अभिनय गीत,बडबड गीत यामधून मुलांमधील सुप्त कलांचा अविष्कार केला जातो. मुलांकडून चित्रे रंगवून घेतली जातात.हस्तकला व मातीच्या वस्तू करून घेण्यात येतात. बेडूक उडया, संगीत खुर्ची या खेळांबरोबरीने मुलांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य वाढीस लागावे याकरिता विशेष प्रशिक्षकाची नेमणूक केली आहे. विद्यार्थ्यांना शाळेतूनच पौष्टीक आहार दिला जातो. मुलांमधील सहिष्णुता वाढीस लागावी याकरिता भातुकलीचे आयोजन केले जाते.